प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका महिलेचा हात असतो, अस आपल्याकडे म्हटले जाते. मग ती महिला पुरुषाची आई असो, बहिण, बायको असो किंवा मग त्याची मैत्रीण अश्या वेगवेगळ्या स्वरूपात वेगवेगळ्या पुरुषांच्या यशस्वीतेच गणित मांडत असताना एकना-एका महिलेचा उल्लेख आवर्जून करावासा वाटतो.
साडेतीनशे वर्षापूर्वी अशाच एका पोराच्या पाठीमागे एक खंबीर स्त्री उभी राहिलेली होती. महाराष्ट्राला अन्याय-अत्याचाराच्या कचाट्यातून सोडवण्यासाठी, पोराच्या जीवाची बाजी न करता तिने आपल्या पोराला अन्याय अत्याचाराविरुद्ध जागृत करून न्यायची दिशा दाखवली होती.
ती आई म्हणजे अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ ह्या होत्या.
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे म्हाळसाबाई व लखुजीराव जाधवांच्या पोटी दि. १२ जानेवारी १५९८ रोजी जिजाबाईंचा जन्म झाला.
ज्या वयात मुली बाहुला-बाहुलीचा खेळ खेळत होत्या. त्या वयात राजमाता जिजाऊंना मात्र भलताच छंद लागलेला असायचा. त्यांना तलवारबाजी लाठी, काठी, घोड्यावरती बसून रपेट मारणे अशासारख्या मर्दानी खेळांची प्रचंड आवड होती.
मात्र एकदा होळीच्या दिवशी देवगिरीचे यादव घराण्याचे वंशज असणाऱ्या लखोजीराव जाधव व जिजाऊंची भेट ही वेरूळच्या भोसल्यांसोबत झाली.
पुढे जाऊन याच जाधव आणि भोसल्यांचे संबंध जुळले. १६०५ ला दौलताबाद येथे जिजाऊंचा विवाह हा भोसल्यांच्या शहाजीराज्यांसोबत झाला.
मात्र खंडागळ्यांच्या हत्तीच्या प्रकरणात जाधव-भोसल्यांनी एकमेकांवर तलवारी उपसल्या. परिणामी भोसले आणि जाधवांच्या एका एका रत्नास आपले प्राण गमवावे लागले.
अश्या प्रसंगात तरणाबांड दत्ताजी मारला गेला म्हणून जाधव कुटुंब दुःख तर भोसल्यांचा संभाजी कायमचा गेला म्हणून भोसले कुटुंब शोकाकुल होते.
पण या दोन दुःखात वाहवत गेलेल्या जिजाऊंच्या मनावर मात्र भलताच दुःखाचा डोंगर उभा होता. या दुःखाला तर सीमाच नव्हती. कारण हे दुःख होते ते विखुरल्या गेलेल्या मराठा समाजाचे. की जो कित्येक दिवस सुलतानाचा अन्याय, अत्याचार सहन करत पुन्हा तिथेच त्या सुलतानाची चाकरी करत होता.
डोळ्यातील पाणी आवरत पतिनिष्ठेला महत्त्व देत जिजाऊंनी माहेराशी कायमचे संबंध तोडले. सगळीकडे उद्विग्न करणारी परिस्थिती असताना जिजाऊ गरोदर राहिल्या. परिणामी बाळंतपणासाठी त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे होत.
मग जिजाऊंचा मुक्काम हा पुण्याच्या उत्तरेस सुमारे सव्वीस कोसांवर असलेल्या बुलंद शिवनेरी किल्ल्यावर हलवण्यात आला. शहाजीराजांची चिंता वगळता जिजाऊंना किल्ल्यावर कसलीच काळजी नव्हती.
भावाच आणि दिराचे दुःख ताजेतवानेच असताना, मात्र एके दिवशी किल्ल्यावरती भयंकर बातमी आली. निजामशहाच्या दरबारात रुजू असलेले लखुजी जाधव व त्यांचे तरुण मुलगे यांच्या विषयी त्याच दरबारातील एक सरदार सफदरखानाने निजामशहाचे मन कलुषित केले व कपटाने चौघांचा घात केला.
दरम्यानच्या काळात विचलित मन असणाऱ्या जिजाऊंच्या कानावरती नेहमीच नवीन काहीतरी भयंकर गोष्टी पडत होत्या. त्यातच आणखी आलेली एका बातमीने जिजाऊंच्या मनातील दुखाच्या भरीला रागाचीही भर पडली. कारण शहाजीराजांचे चुलत भाऊ खेलोजी राजे यांची बायको आणि जिजाऊंनी जाऊ नाशिकला गोदावरीकाठी स्नानासाठी गेली असता तिच्या रुपावर मोगल सरदार महाबतखान फिदा झाला. आणि त्याने तिला दिवसाढवळ्या पळवून नेले.
या गोष्टीने जिजाऊंचे मन स्वस्त बसू देत नव्हते. अशा सगळ्या परिस्थितीत दि. १९फेब्रुवारी १६३० रोजी सुर्यास्तानंतर जिजाऊंना पुत्ररत्न झाले. जिजाऊंच्या पोटी स्वराज्यनिर्माता जन्मास आला.
जिजाऊंनी बाळाची कुंडली जोशी बुवांना दाखवली. कुंडली पाहून जोशीबुवा निशब्द झाले. जोशीबुवांनी जिजाऊंना आपला पुत्र पुरुषोत्तम होईल. या पुत्राचा इतिहास माणसांच्या मुखामध्ये काळानुकाळ राहील. असे सांगत बाळाची कुंडली मांडली होती.
विजापूरचा आदिलशाहा, गोव्याचा फिरंगी, जंजिऱ्याचा सिद्दी आणि वर्धा व गोदावरीच्या दुआबावर मांड टाकून बसलेला कुतुबशाहा अशा पाच जहरी अजगराच्या विळख्यातून महाराष्ट्राला सोडवण्यासाठी आणि तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला न्यायची वागणूक देण्यासाठी जिजाऊंच्या प्रेरणा आणि मार्गदर्शनाखाली रोहिडेश्वरी शिवबाने मित्रांसोबत शप्पत घेऊन स्वराज्य स्थापन केले होते.
स्वराज्य स्थापनेनंतर राजमाता जिजाऊ शिवरायांच्या प्रत्येक निर्णयांमध्ये शिवरायांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असायच्या. उदाहरणच घ्यायचे झाले तर आग्र्याला शिवबाराजे अडकले असताना जनतेच्या सोबत राजमाता जिजाऊ खंबीरपणे उभा राहिल्या.
“अफजलखानाला मारा अन्यथा आम्हाला तोंड दाखवू नका.” अशा स्वरात शिवरायांना स्पष्ट आदेश देणाऱ्या जिजाऊ या ही आम्हाला तितक्याच महत्त्वाच्या वाटतात.
सुलतानाच्या विळख्यातून महाराष्ट्राला सोडवत असतानाच, मिझाराजांशी झालेल्या तहात राजांना रक्ताच्या थेंबाथेंबाने मिळविलेले, कमाविलेले स्वराज्य सहजासहजी गमवावे लागले. या धक्क्याने जिजाऊंनी स्वतःला महालात कोंडून घेतले.
परंतु त्या क्षणीही जिजाऊंनी राजांना मार्गदर्शन केल. इतकेच नव्हे तर प्रसंगी त्यांना रागावून तुम्हाला मरायचेच असेल तर मिझाराजांच्या गोटावर चालून जा. तिथे तुमची राखरांगोळी झाली तरी चालेल पण आमच्या पोटी एक भ्याड पुत्र जन्माला आला, हा कलंक आम्हाला नकोय अश्या स्पष्ट भाषेत बजावून सोडणाऱ्या जिजाऊ होत्या.
स्वराज्याला सोन्याचे दिवस आले. ६ जुन १६७४ रोजी शिवराज्याभिषेक झाला. राजे छत्रपती झाले . जिजाऊंचे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात अवतिर्ण झाले. जिजामातेचे जीवन कृतार्थ झाले. या कृतार्थ, परिपूर्ण जीवनाचा आनंद डोळ्यात साठवितच जिजामातेने जेष्ठ कृष्ण नवमी दिनांक १७ जून १६७४ ला रायगडाच्या पायथ्याशी पाचाड गावी शेवटचा श्वास घेतला.